केंद्र सरकार व राज्य सरकार हे देशातील किंबहुना राज्यातील गरीब व गरजू नागरिकांच्यासाठी पक्की व परवडणारी घरे मिळावीत या उद्देशाने अनेक कल्याणकारी घरकुल योजना राबवत असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री शहरी आवास योजना, रमाई घरकुल योजना, वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना या योजनांचा समावेश होतो.
या पोस्टमध्ये आपण वरील सर्व घरकुल योजनांसाठी अर्ज कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMAY-G)
1 एप्रिल 2016 रोजी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची सुरुवात झाली. ही योजना केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातमार्फत चालवली जाते.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना आणि कच्च्या आणि मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्यांना मूलभूत सुविधांसह पक्या स्वरूपातील घर उपलब्ध करून देणे हे आहे.
या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारचा वाटा अनुक्रमे 60:40 आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम अनुसूचित जाती व जमातींसाठी 60%, अल्पसंख्याकांसाठी 15% तर इतर प्रवर्गासाठी 25% आहे. त्याचबरोबर सर्व प्रवर्गातील 5% कोटा अपंग व्यक्तींसाठी राखीव आहे.
या योजनेअंतर्गत सपाट भागांसाठी 1,20,000 रुपये तर डोंगराळ व कठीण भागांसाठी 1,30,000 रुपये आर्थिक साह्य दिले जाते. याव्यतिरिक्त एलपीजी कनेक्शन, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, सुलभ शौचालय या पायाभूत सुविधा सुद्धा मिळतात.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? ते आपण खाली स्टेप बाय स्टेप पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जावे लागेल.
- ग्रामपंचायतीमधून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा अर्ज घेऊन, या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून, आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
- त्यानंतर अर्ज व जोडलेली सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करून, अर्जाची पोचपावती घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज करू शकता. त्यानंतर…
- केंद्र सरकारकडून मिळालेल्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर, तुम्हाला पुन्हा एकदा या योजनेसाठी फॉर्म भरावा लागतो.
- यासाठी ग्रामसेवक किंवा संबंधित सचिव तुमची माहिती जमा करून सदर अर्जामध्ये भरतात.
- अर्ज भरून सदरचा अर्ज तालुका पंचायत समितीकडे पाठवला जातो.
- त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होते.
- पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुमचे घरकुल मंजूर होते.
प्रधानमंत्री शहरी आवास योजना (PMAY-U)
केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी प्रधानमंत्री शहरी आवास योजना देशातील शहरी भागामध्ये राहणारे गरीब कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केली. या योजनेअंतर्गत विशेषतः शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्यासाठी परवडणारी घरी बांधून देण्याची तरतूद आहे. वरील घटकांसाठी या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या घरांचा आकार 30 चौरस मीटर कार्पेट क्षेत्रफळापर्यंत आहे. या आकारामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशातील संबंधित मंत्रालयाच्या विचारविनिमय आणि मंजुरीनंतर घराच्या आकारामध्ये बदल होऊ शकतो.
या योजनेअंतर्गत घर बांधणी साठी किंवा खरेदीसाठी केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना थेट अनुदान दिले जाते. या अनुदानाची रक्कम 2.50 लाख रुपये इतकी आहे. यासाठी सरकारने काही उत्पन्न मर्यादा सुद्धा घालून दिले आहेत त्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपये, कमी उत्पन्न गटांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 ते 6 लाख रुपये, मध्यम उत्पन्न गट-1 यांच्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 ते 12 लाख रुपये आणि मध्यम उत्पन्न गट-2 यांच्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 12 ते 18 लाख रुपये इतकी आहे.
या योजनेअंतर्गत घराच्या मालकी हक्कासाठी महिलांना प्राथमिकता दर्शवली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या योजनेसाठी सर्व समावेशक धोरण आखण्यात आले आहे त्यानुसार अपंग, वृद्ध नागरिक, अनुसूचित जाती-जमाती यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत घरासोबतच पायाभूत सुविधा सुद्धा देण्यात आले आहेत यामध्ये पाणी, विज, गॅस कनेक्शन, शौचालय, गटार, रस्ते यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्याला कर्जाची सवलत ही दिली गेली आहे त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्याला व्याजदरामध्ये सुद्धा सूट दिली आहे.
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी शहरी भागातील नागरिक ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👉🏽 https://pmay-urban.gov.in/
- संकेतस्थळावर गेल्यानंतर होमपेजवर Apply for PMAY-U 2.0 या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर या योजनेची सर्व मार्गदर्शक तत्वे आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
- त्यानंतर तुमचे वार्षिक उत्पन्न आणि इतर माहिती लिहून पडताळणी करा.
- त्यानंतर आधार कार्ड माहिती सत्यापित करा.
- अर्जामध्ये तुमचा पत्ता, उत्पन्नाचा पुरावा आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- पुढे या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा अर्ज ऑनलाइन करू शकता.
रमाई घरकुल योजना
रमाई घरकुल योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2009-10 पासून झाली. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नव बौद्ध संवर्गातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील गरीब व गरजू व्यक्तींना पक्के घर तसेच कच्च्या घराचे पक्के बांधकाम करण्याकरिता त्याचबरोबर शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी शासनाद्वारे ठरवून दिलेली किंमत अनुदान स्वरूपात या योजनेसाठी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार ग्रामीण भागासाठी 1,32,000 रुपये, डोंगराळ/नक्षली भागासाठी 1,42,000 रुपये आणि शहरी भागासाठी 2,50,000 रुपयांची तरतूद केली आहे.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत घराच्या बांधकामाचे चटई क्षेत्र हे 369 चौरस फूट असणे अनिवार्य आहे. यापेक्षा जास्त घराचे क्षेत्रफळ असेल तर लाभार्थी हा स्वतःच्या मालकीची जागा स्वतःच्या मर्जीनुसार आणि स्वखर्चाने बांधकाम करू शकतो.
रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित वास्तव्यास आहात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन किंवा समाज कल्याण कार्यालयामधून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमधून अर्ज घेतल्यानंतर अर्ज पहिल्यांदा व्यवस्थितपणे पहा आणि जर तुम्हाला काही समस्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांकडून या समस्येचे निराकरण करून घ्या.
- त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडा.
- त्यानंतर अर्ज हा संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करून पोचपावती घ्या.
- त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करून, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला तर, पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लावली जाते.
- त्यानंतर या योजनेअंतर्गत घरबांधणीसाठी मिळणारे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही रमाई घरकुल योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरू शकता.
वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना
वाल्मीकी-आंबेडकर घरकुल योजनेची सुरुवात डिसेंबर 2001 मध्ये झाली. या योजनेची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकार मार्फत केली जाते. या योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा वाटा 50:50 आहे. वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना ही विशेषतः झोपडपट्टी वस्तीमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी सुरू करण्यात आले आहे.
वाल्मिकी-आंबेडकर योजनेच्या माध्यमातून शहरांमधून झोपडपट्ट्या कायमस्वरूपी नामशेष करून सर्वांना निवारा त्याचबरोबर निरोगी वातावरण प्रदान करणे हे सुद्धा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी 1,50,000 ते 2,50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. हे अनुदान घराचे ठिकाण आणि योजनेच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे.
वाल्मीकि आंबेडकर घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼 https://mahahousing.gov.in/
- संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला योजना विभागात जावे लागेल.
- योजना विभागामध्ये वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेवर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला तुमचे नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांकाची नोंद ठेवा.
अशा पद्धतीने तुम्ही वाल्मीकी-आंबेडकर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज करणार असाल तर, तुम्हाला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या(महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत) कार्यालयामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक व काळजीपूर्वक भरून आवश्यकता कागदपत्रांची अर्जासोबत झेरॉक्स कॉपी जोडा.
- त्यानंतर अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करून अर्जाची पोच पावती घ्या.
- अर्ज पडताळणी केल्यानंतर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर, तुमचे नाव घरकुल यादीत येईल.
- घरकुल यादीमध्ये नाव आल्यानंतर या योजनेअंतर्गत देण्यात येणारे रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
अशा रीतीने तुम्ही वाल्मिकी-आंबेडकर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज करू शकता.
केंद्र व राज्य सरकार घरकुल योजनांसाठीचे स्वरूप वेळोवेळी बदलले जाते. यामध्ये अनुदानाची रक्कम वाढवली जाते त्याचबरोबर घरकुल योजनेच्या पात्रतेमध्येही बदल केला जातो.
वरील सर्व घरकुल योजना या राज्य व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना म्हणून ओळखल्या जातात. या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब व गरजू लोकांना पक्क्या घरांबरोबरच अनेक पायाभूत सुविधा देणे हा आहे.
या पोस्टमध्ये आपण केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनांसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे? याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही वरील घरकुल योजनांचा लाभ घेणार असाल तर, वर दिलेल्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद!