Ramai Gharkul Aawas Yojana 2025
आजही आपल्या देशामध्ये अनेक कुटुंबे अशा परिस्थितीमध्ये आहेत की, त्यांच्यासाठी स्वतःचे घर बांधणे हे केवळ स्वप्न आहे. अशा कुटुंबांसाठी केंद्र व राज्य सरकार विविध घरकुल योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली रमाई घरकुल आवास योजना(Ramai Aawas Yojana) होय. रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे या उद्देशाने ही योजना राज्यामध्ये राज्य सरकारकडून राबवली जाते.
या पोस्टमध्ये आपण रमाई आवास योजनेबाबतची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया.
रमाई घरकुल आवास योजनेविषयी थोडक्यात..
रमाई आवास योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वाची घरकुल योजना आहे. सदर योजनेची सुरुवात 2009-10 पासून सुरू करण्यात आली होती. ही योजना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईंच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मालकीच्या जागेवर घरकुल उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
रमाई घरकुल आवास योजनेचे स्वरूप
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील गरीब व गरजू व्यक्तींना पक्के घर तसेच कच्च्या घराचे पक्के बांधकाम करिता तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यास शासन निर्णयाद्वारे विहित किंमत मर्यादित अनुदान रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते. यानुसार..
- ग्रामीण भागासाठी ₹1,32,000 रुपयांची तरतूद या योजनेअंतर्गत केली आहे.
- डोंगराळ/नक्षलवादी भागासाठी ₹1,42,000 रुपयांची तरतूद या योजनेअंतर्गत केली आहे.
- शहरी भागासाठी ₹2,50,000 रुपयांची तरतूद या योजनेअंतर्गत केली आहे.
रमाई घरकुल आवास योजनेसाठी या घटकांना प्राधान्य
- जातीय दंगलींमध्ये घरांचे नुकसान झालेल्या व्यक्तींना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येते.
- ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार पीडित अनुसूचित जातीची व्यक्ती
- पूरग्रस्त क्षेत्र
- विधवा महिला
- दिव्यांग
- एकल माता
- वयोवृद्ध नागरिक
- उर्वरित सर्व क्षेत्र
रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घराचे क्षेत्रफळ
रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घराच्या बांधकामाचे चटई क्षेत्र 369 चौरस फूट असणे अनिवार्य आहे. या क्षेत्रासाठीच या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येईल. यापेक्षा जास्त घराचे क्षेत्रफळ असेल तर लाभार्थी हा स्वतःच्या मालकीची जागा स्वतःच्या स्वखर्चाने व मर्जीनुसार बांधकाम करू शकतो.
रमाई घरकुल आवास योजनेसाठी आवश्यक पात्रता
रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेअंतर्गत असलेल्या अटी व शर्ती मध्ये तुम्ही पात्र असणे आवश्यक आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत? ते आपण खाली पाहूया:
- सदर योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा मागील 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- यापूर्वी अर्जदाराने शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, यामध्ये म्हाडामार्फत, माननीय मुख्यमंत्री स्वेच्छा निर्णयानुसार वितरित झालेली सदनिका आणि वाल्मिकी आंबेडकर आवास योजना यांचा समावेश होतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची वार्षिक उत्पन्न, जर अर्जदार ग्रामीण क्षेत्रातील असेल तर, त्याचे वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 असणे आवश्यक आहे. अर्जदार जर नगरपरिषद क्षेत्रामध्ये राहत असेल तर, त्याचे वार्षिक उत्पन्न ₹1,50,000 असणे आवश्यक आहे. जर अर्जदार महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असेल तर, त्याचे वार्षिक उत्पन्न ₹2,00,000 असावे. त्याचबरोबर अर्जदार हा मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये वास्तव्यास असेल तर, त्याचे वार्षिक उत्पन्न ₹3,00,000 असणे आवश्यक आहे. वर दिलेल्या विविध क्षेत्रातील अर्जदाराचे उत्पन्न हे यापेक्षा जास्त असेल तर, तो या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असेल.
- नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमांतर्गत, शासनाच्या प्राप्त होणाऱ्या 5% सदनिकांमधून कोणत्याही नागरी समूहात सदनिका वितरित झाल्यास या योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असाल.
रमाई घरकुल आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
रमाई घरकुल आवास योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर, अर्जासोबत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत? हे आपण खाली पाहूया:
- ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंदणी पत्र आणि ग्रामपंचायत मालमत्ता नोंद वहीतील उताऱ्यापैकी एक उतारा असणे आवश्यक आहे.
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- घरपट्टी, पाणीपट्टी, विज बिल यापैकी एक
- महानगरपालिका/नगरपालिका मालमत्ता कर भरल्याची प्रत
- पासपोर्ट साईज फोटो
रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
रमाई घरकुल आवास योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
रमाई घरकुल आवास योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका येथून किंवा समाज कल्याण कार्यालयातून अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर अर्ज व्यवस्थितपणे पहा आणि जर तुम्हाला काही समस्या असतील तर संबंधित अधिकाऱ्याकडून समस्यांचे निराकरण करून घ्या.
- त्यानंतर अर्ज भरून आवश्यक असलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडा.
- अर्ज हा संबंधित कार्यालयामधील अधिकाऱ्याकडे जमा करून पोचपावती घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही रमाई घरकुल आवास योजनेचा अर्ज ऑफलाइन करू शकता. वरील कागदपत्रांमध्ये शासनाच्या नियमानुसार काही बदल होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही संबंधित संकेतस्थळावरती किंवा ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका व महानगरपालिका यांना भेट देऊन अपडेट राहणे गरजेचे आहे.
रमाई घरकुल आवास योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- रमाई घरकुल आवास योजनेचा ऑनलाईन अर्ज यासाठी तुम्हाला शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर जावे लागेल.
- संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करून लॉगिन करावे लागेल.
- लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर रमाई घरकुल आवास योजनेचा अर्ज ओपन होईल.
- सदरच्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अगदी अचूक भरायची आहे. जसे की तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, ई-मेल आयडी इ.
- त्यानंतर या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
अशाप्रकारे तुम्हाला रमाई घरकुल आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड लॉटरी पद्धतीने
या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्यातून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. ही लॉटरी समाज कल्याण अधिकारी यांच्या स्तरावर संगणकीय पद्धतीने काढली जाईल. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून ती ठळक पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येईल. अशी निवड झाल्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांतर्गत घरे बांधण्यास परवानगी देण्यात येईल. लाभार्थ्यांची निवड करताना खालील अटी व शर्ती बंधनकारक असतील..
- ज्या व्यक्तीकडे स्वतःची जमीन/जागा आहे अशा व्यक्तींना प्रथम टप्प्यात
- तर ज्या व्यक्तीकडे स्वतःची जागा नाही अशा ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी आणि जागा उपलब्ध झाल्यानंतर गंध घर बांधण्याची परवानगी देण्यात येते.
- नगरपरिषद/महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षित जागेवर वसलेल्या झोपडपट्टीतील व्यक्तींची नावे 1/1/1995 च्या मतदार यादीत असतील तर अशा व्यक्तींना पात्र समजून आहे त्याच जागेवर घर बांधण्यास मंजुरी द्यावी.
रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज करताना तुम्ही अपडेट राहणे आवश्यक आहे, कारण घरकुल योजनांसाठींचे शासन निर्णय वेळोवेळी बदलत असतात.
रमाई घरकुल आवास योजनाही समाजातील सर्वात वंचित घटकांना त्यांचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे या योजनेचा पात्र नागरिकांनी लाभ घेऊन आपले स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकार करावे. धन्यवाद!